बंद

    परिचय

    बीड जिल्हा – परिचय

    बीड जिल्हा छत्रपती संभाजीनगर विभागाच्या केंद्रस्थानी असून, याचे एकूण क्षेत्रफळ 10,68,600 हेक्टर आहे. 2011 च्या जनगणनेनुसार, जिल्ह्याची लोकसंख्या 25,85,049 (25.85 लाख) असून, यापैकी 5,14,298 (5.14 लाख) लोक शहरी भागात आणि 20,70,751 (20.70 लाख) लोक ग्रामीण भागात राहतात.

    बीड जिल्ह्याच्या सीमा पुढीलप्रमाणे आहेत:

    उत्तर: औरंगाबाद व जालना
    पश्चिम: अहमदनगर
    दक्षिण: उस्मानाबाद
    पूर्व: लातूर व परभणी
    जिल्ह्यात 11 तालुके आणि 11 पंचायत समित्या आहेत. तसेच, 1,403 गावे आणि 1,034 ग्रामपंचायती आहेत.

    भौगोलिक व कृषी स्थिती

    जिल्ह्याच्या उत्तर आणि दक्षिण भागात सिंदफना आणि मांजरा नद्यांमुळे जमीन सुपीक आहे, तर उर्वरित भाग खडकाळ व कोरडवाहू शेतीयोग्य आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने ज्वारी, बाजरी आणि गहू ही पिके घेतली जातात. बीड जिल्हा हा अवर्षण प्रवण (दुष्काळग्रस्त) क्षेत्रात मोडतो आणि येथील सरासरी वार्षिक पर्जन्यमान 699.30 मिमी आहे.

    अहवालानुसार शेती क्षेत्र:

    एकूण अन्नधान्य क्षेत्र: 47,428 हेक्टर
    ज्वारी: 1,933 हेक्टर
    डाळी: 96,011 हेक्टर
    गहू: 47,980 हेक्टर
    कापूस: 2,69,596 हेक्टर
    एकूण शेतीयोग्य जमीन: 8,85,213 हेक्टर
    पिकाखालील जमीन: 7,87,600 हेक्टर
    सिंचित क्षेत्र: 1,47,000 हेक्टर

    पशुसंवर्धन

    2017 च्या पशुगणनेनुसार, बीड जिल्ह्यात एकूण 62,76,897 पशुधन आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत पशुधनासाठी 57 पदवीधर वैद्यकीय संस्था आणि 83 बिगर-वैद्यकीय संस्था कार्यरत आहेत. या केंद्रांमध्ये औषधोपचार, लसीकरण, कृत्रिम रेतन, गर्भ तपासणी, वंध्यत्व निदान, पशुप्रदर्शन आणि प्रशिक्षण शिबिरे यासारख्या सुविधा पुरवल्या जातात.

    औद्योगिक विकास

    औद्योगिक दृष्टिकोनातून बीड जिल्हा अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कमी विकसित आहे. मात्र, परळी वैजनाथ येथे वीज निर्मिती केंद्र कार्यरत आहे. जिल्ह्यात एकूण 8 सहकारी साखर कारखाने आहेत. तसेच, बीड येथे स्थानिक आकाशवाणी केंद्र आहे.

    अहमदनगर ते परळी हा रेल्वे मार्ग बीडमार्गे प्रस्तावित आहे. काही भागांत लघुउद्योग सुरू असून वडवणी व पिंपळनेर (ता. गेवराई) येथे सूतगिरण्या कार्यरत आहेत.

    पर्यटन व सांस्कृतिक वारसा

    बीड जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक व धार्मिक स्थळे आहेत:

    • परळी वैजनाथ – भारतातील बारापैकी एक ज्योतिर्लिंग
    • सौताडा – प्रसिद्ध रामेश्वर मंदिर व धबधबा
    • कपिलधार – प्रसिद्ध धबधबा
    • नायगाव (ता. पाटोदा) – मोर अभयारण्य
    • कंकालेश्वर मंदिर (बीड) व खंडेश्वरी देवी मंदिरातील दीपमाळा
    • नारायणगड – “दक्षिण पंढरपूर” म्हणून ओळखले जाते
    • अंबाजोगाई – आद्यकवी मुकुंदराज समाधी व योगेश्वरी देवी मंदिर
    • धारूर – प्रसिद्ध भुईकोट किल्ला